प्रतिनिधी बीड
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला जाहीर झाला आणि भाजपप्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र, आठवडा उलटून गेला, तरी अद्याप सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही आणि नव्या मुख्यमंत्र्यांचं नावही जाहीर करण्यात आलं नाहीय.
एकनाथ शिंदे हे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. मात्र, ते त्यांच्या साताऱ्यातील गावी जाऊन बसले आहेत.
ना शिंदेंच्या शिवसेनेकडून, ना भाजपकडून, ना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदी कोण बसणार, हे सांगितलं गेलं नाहीय.
याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वैयक्तिक एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवरून महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची माहिती दिलीय.बावनकुळेंच्या माहितीनुसार, येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडेल.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी 5 डिसेंबररोजी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.”
महायुतीच्या राज्यातील नेत्यांची बैठक होण्यापूर्वीच भाजपने शपथविधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
शिवाय, सत्ता स्थापनेचा दावा केला नसताना आणि शपथविधीबाबत राज्यपालांच्या कार्यलयाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नसताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रम जाहीर केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
