अंबाजोगाई: संविधान व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाईच्या वतीने स्मृतीशेष घनःशाम समिंद्राबाई एकनाथ घोबाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ त्यांच्या पावन स्मृतीस लेखक प्राचार्य डॉ. विवेक आशा घनःशाम घोबाळे यांनी स्वयं हिंदी लिखित ‘सुषम बेदी का गद्य साहित्य’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा घेऊन व्हायली साहित्यिक श्रद्धांजली! या कार्यक्रमाच्या स्वागत व सत्कार प्रसंगी प्रा. राहुल सुरवसे व त्यांचा संच यांनी “परिवर्तनवादी प्रबोधनपर गीतांचे” सुंदर असे सादरीकरण केले. सर्वप्रथम कार्यक्रमात ग्रंथांची पूजा करून वडिल स्मृतीशेष घनःशाम घोबाळे व स्मृतीशेष प्रवासी कथाकार सुषम बेदी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मान्यवरांना शॉल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव व सत्कार करण्यात केला व यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले
तसेच या कार्यक्रमात गुणवंतांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लेखक प्राचार्य डॉ. विवेक घोबाळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकमधे त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक जीवन प्रवासात आई-वडील भाऊ-बहीण, पत्नी, मुलं, प्रिय गुरुजन वर्ग, भाषा, साहित्यकार आणि साहित्य यांचे सुसंस्कार त्यांच्यावर कसे झाले आणि त्यातून साहित्य कसे निर्माण झालं यावर प्रकाश टाकला. शेवटी “शब्दों में पिता” ही कविता सादर करून स्मृतीशेष परमपूज्य स्वर्गीय पिता घनःशाम समिंद्राबाई एकनाथ घोबाळे यांना खऱ्या अर्थाने “साहित्यिक श्रद्धांजली अर्पण” केली.
असा हा स्तुत्य कार्यक्रम पहिल्यांदाच पाहायला मिळाला. या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र स्तरावर होत आहे. खऱ्या अर्थाने पित्याला, पुत्रांकडून साहित्यिक श्रद्धांजली व आदरांजली वाहिली गेली. आणि नक्कीच हा कार्यक्रम समाजामध्ये पुण्यस्मरण जयंती किंवा इतर कार्यक्रमात असे साहित्यिक व प्रबोधन पर कार्यक्रम घडले जावेत. हा सर्वांसाठी आदर्श कार्यक्रम ठरेल !
यानंतर प्रमुख वक्ते, साहित्यिक डॉ. सतीश यादव यांनी याप्रसंगी स्मृतीशेष घनःशाम घोबाळे यांच्या पुण्यस्मरणार्थ प्रवासी कथाकार “सुषम बेदि का गद्य साहित्य” या नवीनतम पुस्तकावर सविस्तरपणे व अभ्यासपूर्ण विचार मांडले. ते बोलताना म्हणाले, लेखक, प्राचार्य डॉ. विवेक घोबाळे यांनी हिंदी साहित्यामध्ये ‘प्रवासी भारतीय’ ही विधा घेऊन संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण पुस्तकाची निर्मिती केली आहे. लेखकाने उत्तर भारत व दिल्ली साहित्यकारांमधे प्रवेश केला. एवढेच नव्हे तर त्यांनी जागतिक साहित्याचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांचं हे लेखन कार्य, विचार करण्याची कला ‘प्रवासी कथाकार सुषम बेदी केंद्रीत’ असून भारतातून परदेशात वास्तव्यास (एन. आर.आय.) गेलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांवर (विशेषतः स्त्रियांवर) प्रकाश टाकला आहे. यामध्ये त्यांनी विविध स्त्री-विमर्श म्हणजे आदिवासी विमर्श, दलित विमर्श, सामाजिक विमर्श, आर्थिक विमर्श, राजनीतिक विमर्श व साहित्यिक विमर्श अशा इत्यादी विमर्शांवर चर्चा व सखोल अभ्यास या पुस्तकात केला गेला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, लेखकावर लिहिणं सोपं असतं परंतु लेखकाला जिवंत ठेवून त्यांच्या विचारांची जागृती करणं त्यापेक्षा महत्त्वाचं असतं. आणि ते साहित्यिक कार्य प्राचार्य डॉ. विवेक यांनी केलं आहे. या पुस्तकाचं वाचन स्त्री-पुरुषांनी करायलाचं हवं. (विशेषतः स्त्रियांनी) या पुस्तकाचं वाचन केलं तर त्यामधील पात्र हे विदेशातील पात्र नसून आपल्या अवतीभोवतीच्या परिसरातलं असल्याचं दिसून येईल. या पुस्तकातलं उदाहरण देताना त्यांनी बोलले की, लेखकाने विदेशातल्या स्त्रीवर अत्याचार झाला तर त्या स्त्रीच्या पुढील जीवनाला बळकट करण्यासाठी तिथला समाज हा ठामपणे तिच्यासोबत उभा राहतो. परंतु अगदी या उलट भारतात अशा स्त्रियांची हेटाळणी केली जाताना पाहावयास मिळते. तिला वाळीत टाकलं जातं, तिच्यासोबत अनैतिक वर्तन व व्यवहार केला जातो, तिला सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून बेदखल करण्याचं दुर्दैव इथला समाज करतो. हा मोठा फरक त्यांनी त्यांच्या पुस्तकात संवेदनशीलपणे मांडला. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये विविध जाती, धर्माचा प्रभाव इथल्या नागरिकांवर असल्यामुळे दक्षिण भारत व महाराष्ट्र राज्यातील करारबद्ध मजूर (गिरमिटिया) हे विदेशात वास्तव्यास गेल्यावर त्यांना मानसिक बळ मिळण्यासाठी व भारतीय संस्कृतीचे संस्कार दृढ झाल्यामुळे ते आपल्या सोबत आपले धार्मिक ग्रंथ श्रद्धापूर्वक घेऊन जातात आणि त्यांची आराधना किंवा उपासना करत असतात. कारण त्यांना मानसिक शांति हवी असते. कांहीतरी आपल्या सोबत वाईट होईल का? याची भीती त्यांना सतत भेडसावत असते. प्रामुख्याने भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. परंतु देशात वाढता लोकसंख्येचा विस्फोट व बेरोजगारीचा भस्मासुर यावर मात करण्यासाठी आजची तरुणाई ही आर्थिक सक्षम व अधिकचं स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी मूलतः भारतीय असलेले नागरिक हे विदेशी जाऊन तिथल्या संस्कृतीला बळी पडतानाचे चित्र त्यांनी आपल्या या पुस्तकात सविस्तरपणे मांडलं आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी आदि. भाषिकांनी वाचावे विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, लेखक, साहित्यकार या सर्वांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. शेवटी लेखक डॉ. विवेक घोबाळे यांना साहित्यिक प्रवासासाठी खूप-खूप शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. दादाहरी कांबळे बोलताना म्हणाले की, प्राचार्य डॉ. विवेक घोबाळे यांचे शैक्षणिक व साहित्यिक कार्य गौरवास्पद आहे. कारण त्यांचे विद्यार्थी दशेपासूनचे वर्तन नम्र, संवेदनशील, अनुशासन प्रिय, चिंतक व अभ्यासू असल्यामुळे ते आज श्री संत गजानन अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सर्वोच्च पदाची भूमिका पार पाडत आहेत. मला लेखकाचा व घोबाळे परिवाराचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांनी भविष्यात हिंदी, मराठी व इंग्रजी साहित्यात भरपूर प्रमाणात पुस्तकं लिहावीत व साहित्य निर्माण करावं. साहित्यिक क्षेत्रात त्यांची उंची आणखी वृद्धिंगत होत राहो. अशा अनेकानेक शुभेच्छापर आशीर्वाद दिला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राचे प्रख्यात कवी, गझलकार डॉ. मुकुंद राजपंखे यांनी सुप्रसिद्ध गझल “घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे” ही सादर केली. आणि लेखक, प्राचार्य डॉ. विवेक घोबाळे यांच्यावर शब्दरूपी फुलांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ते पुढे म्हणाले की, अंबाजोगाईच्या शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य डॉ. विवेक घोबाळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. आणि अंबाजोगाईच्या या साहित्यिक भूमीत त्यांनी आपली नवी ओळख निर्माण करत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. आणि तो अंबाजोगाईकरांसाठी कायमच अभिमानास्पद राहिल. त्यांच्या हातून अनेक “विद्यार्थी प्रिय शिक्षक” घडत आहेत. अंबाजोगाई ही साहित्याची भूमी, मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची भूमी ही आहे. इथे “विवेक सिंधू”ची निर्मिती झाली. याच भूमीतलं हे रोप आहे. महोदय, प्राचार्य डॉ. विवेक घोबाळे यांच्या नावातच ‘विवेक’ असल्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची ख्याती शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात नक्कीच कमालीचं वलय निर्माण करणारी ठरेल. असे हृदयस्पर्शी व प्रेरणादायी उद्गार या प्रसंगी काढले.
यानंतर संविधान व जागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विशाल आशा घनःशाम घोबाळे यांनी बंधू, साहित्यकार, प्राचार्य डॉ. विवेक जी घोबाळे यांचा भाऊ म्हणून मी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आपल्या नवीनतम पुस्तकाचा शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात ठसा उठविला. आपण महाराष्ट्र, उत्तर भारतचं नव्हेतर जागतिक स्तरावर देखील आपल्या व्यक्तित्वाचा व कारकिर्दीची नोंद झाली आहे. आणि भविष्यात देखील होत राहील. याचा घोबाळे परिवारासह अंबाजोगाईकरांना देखील नेहमीच अभिमान वाटेल. अशा हृदयस्पर्शी शुभेच्छा देत सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे, लेखक, कवी, साहित्यकार व उपस्थितितांचे हार्दिक आभार मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दादाहरी कांबळे तर साहित्यकार, प्रमुख वक्ते डॉ. सतीश यादव, लातूर, श्रीमती आशा घनःशाम घोबाळे (आई), प्रमुख पाहुणे प्राचार्य दामोदर थोरात, ॲड. शाम तांगडे, उपप्राचार्य रमेश शिंदे, प्रख्यात कवी गझलकार डॉ. मुकुंद राजपंखे, डॉ. अहिल्या बरुरे, डॉ.रोहिणी खंदारे, ॲड. दिलीप गोरे, श्री प्रशांत लाटकर, श्री सूर्यकांत लाटे व ॲड. विशालजी घोबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमासाठी ज्यांनी ताकदीने प्रयत्न केले असे संयोजन समिती सदस्य प्रा. प्रमोद सिताप, प्रा. अनिल बांगर, श्री सचिन गायकवाड, श्रीपाद कुलकर्णी, ॲड. संतोष देशपांडे, प्रा. दत्ता कलेढले, श्री सुशील कदम, श्री सुनील वाघमारे, सौ. शिल्पा घोबाळे, सौ.रेखा घोबाळे, घोबाळे परिवार तसेच महाविद्यालयाचे छात्र-अध्यापक नमिता झिरमिरे, आरती दळवी, हनुमंत शिंदे, बालाजी आचार्य, श्रीनिवास पांचाळ, रमशा सय्यद, पूजा पांचाळ, ज्योती माने, जयश्री वाघमारे, सहकारी प्राध्यापक, डॉक्टर, वकील आदींनी अथक प्रयत्न घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला. या कार्यक्रमासाठी “लेखकावर प्रेम करणारी माणसं” अंबाजोगाई, बीड, धारूर, लातूर, माजलगाव, परभणी इत्यादी ठिकाणाहून साहित्यप्रेमी, रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर ‘आशा घोबाळे निवास’ फ्लावर्स लाईन येथे सुरुची भोजनाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती.
