
प्रतिनिधी केज
ज्यांच्या जीवन कार्याने करोडोंच्या जीवनात स्वातंत्र्य सूर्य उगवला.. सूर्यप्रकाशात जीवन उजळले.. भारतवर्षाला दिशा मिळाली अशा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस.*
*अत्यंत प्रतिकुल सामाजिक परिस्थितीला तोंड देत.. मानवी हक्कही नाकारणाऱ्या स्वकियांशी प्रदीर्घ संघर्ष त्यांना करावा लागला. पण त्यांनी ही लढाई अचाट बुद्धिमत्ता.. कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर जिंकली.*
*त्यांच्या नेतृत्वाचा समाजात एवढा प्रभाव होता की, त्यांनी केलेली सर्वच आंदोलने ही शांततापूर्ण वातावरणात संपन्न होत. संपूर्ण समाज माझाच आहे; भलेही तो आमच्याशी चुकीचे वागला, तरीही ही बाबासाहेबांकडे उदार अंतकरणाची विशाल भावना होती. यामुळेच त्यांचे नेतृत्व लोकांचे मन आणि मत परिवर्तन करणारे ठरले.. अस्पृश्यता हद्दपार झाली. समाजात समता निर्माण झाली. सौदार्ह टिकले. राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळाले.*
*उच्चविद्याविभूषित असे बॅरिस्टर बाबासाहेब हे भारतातील पहिले अर्थतज्ञ. जीवन संघर्षातही त्यांनी देशविदेशातून प्राप्त केलेल्या अनेक पदव्या.. मानसन्मान थक्क करणारे आहेत. डॉ. बाबासाहेबांना एकाच वेळी अनेक क्षेत्रातील सखोल ज्ञान होते. शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी कायदे करताना या ज्ञानाचा उपयोग केला.*
*नेतृत्व कसे असावे याचा आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब. जगातील प्रत्येकाने स्वतःची उन्नती कशी करावी याचा ते आदर्श ठरले. वडिलांच्या संस्काराने बालपणीच त्यांना वाचनाची आवड लागली. कबीर.. महात्मा फुले आणि भगवान बुद्ध हे बाबासाहेबांचे आदर्श. या ज्ञान तपस्वींनी विकासासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे समाजात बिंबविले.*
*बाबासाहेब हे सर्वच क्षेत्रासाठी दीपस्तंभ. भारतातील पहिले अर्थतज्ञ. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी.. त्यांनी कामगारांचे.. शेतकऱ्यांचेही नेतृत्व केले. न्याय दिला. महिलांना हक्क मिळवून दिले. शेती सुधारणा.. शाश्वत पाणी पुरवठा यावरची मते सदैव मार्गदर्शक आहेत.*
*शिक्षण जे प्रज्ञा.. शील.. करुणा हे गुण अंगी बाणवायला शिकवते. चांगले वाईट याची जाण होते. शिक्षणाने मुलांची मने सुसंस्कृत.. गुणवत्तामय व्हावीत. सामाजिक बांधिलकीची कर्तव्य समर्थपणे पार पडता यावी असे शिक्षण हवे असे म्हणायचे. शिक्षणसंस्था काढल्या. ज्ञानतपस्वी बाबासाहेब रोज बारा तास विविध विषयावर वाचन करायचे. मनुष्य जन्मभर विद्यार्थीच आहे असे ते म्हणत. त्यांच्या स्वतःच्या वाचनालयात पन्नास हजार पुस्तके होती. स्मारके ही ग्रंथालये व्हावीत असे म्हणत. “वाचाल तर वाचाल” हा बाबासाहेबांनी दिलेला विचार.*
*समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाचे जीवन जगण्यासाठी संरक्षणाची कवचकुंडले प्राप्त करुन देणारे संविधान.. राज्यघटना डॉ. बाबासाहेबांनी दिली. कायद्याने सर्वसामान्यांना समसमान अधिकार प्राप्त झाले. या घटनेने प्रत्येकाला न्याय दिलाय हे बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे, म्हणूनच ह्या राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले.*
*स्वातंत्र्य पूर्व आणि नंतरच्या काळात त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले. महिला.. कामगार यांना न्याय दिला. देशाचे पाटबंधारे धोरण निश्चित करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.*
*डॉ. बाबासाहेब हे द्रष्टे नेते. भारताच्या विकासासाठी त्यांचे विचार सदैव मार्गदर्शक आहेत. घटनेव्दारे सामान्य जनांना सुरक्षा.. समानता.. न्याय दिला. प्रादेशिक भाषेचा सन्मान करुन देशपातळीवर समर्थन केले.*
*थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, सर्वांना न्याय देणारे संसद सदस्य अशी डॉ. बाबासाहेब यांच्या व्यक्तीमत्वाची ओळख.*
*भारतवर्षात लोकशाही कायमस्वरूपी टिकावी म्हणून डॉ. बाबासाहेब यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी विवेक शिकवला. प्रदान केलेल्या घटनेचा.. संविधानाचा सन्मान करण्याचे संस्कार लोकांमध्ये रुजविले. त्यांचे तत्कालिन सर्वच नेते मंडळींशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. वैचारिक मतभेद असू शकतात पण मनभेद नकोत याचा आदर्श ठेवलाय.*
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन
प्रा . धनराज भालेराव






